बोईसर

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही शाळेकडून मराठीचा अपमान कायम!

पास्थळ येथील जे.एस. एज्युकेशन शाळेचा मुख्य फलक इंग्रजीतच; शिक्षण विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

बोईसर :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्यभरात मराठीच्या सन्मानाचा गजर सुरू असताना, पालघर जिल्ह्यातील पास्थळ येथील जे.एस. एज्युकेशन शाळा मात्र या निर्णयाला थेट हरताळ फासताना दिसत आहे. शासनाने स्पष्ट आदेश दिलेले असतानाही शाळेचा मुख्य नामफलक आजही इंग्रजी भाषेतच झळकत असून मराठी भाषेचा उघड अपमान केला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था, खासगी असोत वा अनुदानित, मुख्य फलक मराठी भाषेत असणे बंधनकारक आहे. असे असताना जे.एस. एज्युकेशन शाळेने शासन आदेशांना केराची टोपली दाखवत इंग्रजी फलक लावून ठेवला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार संबंधित शिक्षण विभागाच्या निदर्शनास वारंवार आणूनही कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मराठी ही केवळ भाषा नसून महाराष्ट्राची ओळख, संस्कृती आणि अस्मिता आहे. मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही जर शाळाच मराठीला दुय्यम वागणूक देत असतील, तर विद्यार्थ्यांमध्ये मराठीबद्दल अभिमान कसा निर्माण होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शिक्षण हे संस्कार घडविण्याचे माध्यम असते. पण ज्या ठिकाणी मराठी भाषेचे प्राथमिक स्तरावरच उल्लंघन होत असेल, तेथे मराठी भाषेच्या संवर्धनाच्या गप्पा फक्त दिखावा ठरत आहेत. शाळा व्यवस्थापनाचा हा दुटप्पीपणा आणि शिक्षण विभागाची बघ्याची भूमिका संशयास्पद असून, यामागे कोणाचा आशीर्वाद आहे? असा सवाल आता जोर धरू लागला आहे.

जर लवकरात लवकर शाळेचा मुख्य फलक मराठीत न लावता, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न केल्यास मराठी प्रेमी संघटना आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देणाऱ्या शासनाने आता केवळ घोषणा न करता अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलावीत, अन्यथा मराठीचा सन्मान कागदावरच राहील आणि वास्तवात मराठीचा अपमान होत राहील, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button