शाळेत जीवाशी खेळ! सुरक्षा साधनांशिवाय दुसऱ्या मजल्यावर रंगरंगोटी, शाळा व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा उघड

बोईसर :- जवळील पास्थळ येथील जे एस एज्युकेशन सोसायटी शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी सुरू असताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा न वापरता थेट दुसऱ्या मजल्यावर काम सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, जाळी किंवा कोणतेही संरक्षक साधन न वापरता कामगारांना उंचावर चढवण्यात येत असून, हा प्रकार म्हणजे थेट जीवाशी खेळच असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या धोकादायक प्रकाराकडे मुख्याध्यापकांचे लक्ष वेधण्यात आल्यानंतरही, “गेल्या अनेक वर्षांपासून असेच काम चालते” असे उत्तर मिळाल्याने शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाचा कळस गाठल्याचे स्पष्ट झाले आहे. नियम, कायदे आणि मानवी सुरक्षिततेकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
कामगारांच्या सुरक्षेकडे इतका बेपर्वा दृष्टिकोन ठेवणाऱ्या शाळा व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत किती गांभीर्य असेल, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. शाळेच्या आवारात दररोज शेकडो विद्यार्थी ये-जा करत असताना अशा धोकादायक पद्धतीने काम सुरू ठेवणे म्हणजे मोठ्या अपघाताला खुले आमंत्रण देण्यासारखे आहे.
शिक्षण विभाग, कामगार सुरक्षा विभाग आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित शाळा व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पालक व नागरिकांकडून केली जात आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जाग येण्याऐवजी, प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचा इशाराही यानिमित्ताने देण्यात येत आहे.



