गुंदले ग्रामसभेत नियमांचा खेळखंडोबा! पेसा कायद्याचे उल्लंघन उघड – सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाईची शिफारस
नियमबाह्य विशेष ग्रामसभा; करमतारा इंजिनिअरिंगसाठी मंजूर ठराव वादाच्या भोवऱ्यात

बोईसर : पालघर तालुक्यातील गुंदले ग्रामपंचायत (ता. पालघर) येथे ऑक्टोबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभांमध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम तसेच पेसा कायद्याच्या तरतुदींचा भंग झाल्याचा धक्कादायक खुलासा पंचायत समिती पालघरच्या चौकशी अहवालातून झाला आहे. या प्रकरणी संबंधित सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला आहे.
चौकशी अहवालानुसार, गुंदले ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रात येत असल्याने विशेष ग्रामसभा घेण्यापूर्वी किमान १५ दिवसांची पूर्वसूचना देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र ३, ७, २० आणि २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभा केवळ ५ ते ७ दिवसांच्या नोटीशीवर आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे, तर ग्रामसभांचे ठिकाण आणि वेळ वारंवार बदलण्यात आले. या बदलांची माहिती ग्रामस्थांना योग्य व वेळेत न दिल्यामुळे नागरिकांचा सहभाग अत्यल्प राहिला, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, १७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत एमआयडीसी तारापूर, बोईसर येथील करमतारा इंजिनिअरिंग प्रा. लि. यांना बांधकाम नाहरकत दाखला देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र ही ग्रामसभा नियमबाह्य पद्धतीने घेतल्याने संबंधित ठरावाची वैधताच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
चौकशीत आणखी गंभीर बाब समोर आली असून, सरपंच जयेश किशन आहाडे यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी न घेता स्वतःच्या एकट्याच सहीने संबंधित कंपनीला बांधकाम नाहरकत दाखला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ग्रामविकास अधिकारी पंकज दामोदर संखे यांनी पेसा क्षेत्रातील ग्रामसभांबाबत लागू असलेल्या नियमांचे पालन होते की नाही, याची आवश्यक ती दक्षता न घेतल्याचेही चौकशी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
पंचायत समिती पालघरचे विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात संबंधित सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर नियमानुसार प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असा ठोस प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे गुंदले ग्रामपंचायतीतील प्रशासन, निर्णयप्रक्रिया आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ स्तरावरून पुढे कोणती ठोस कारवाई होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


