पालघर

अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी सैन्य-पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण

पालघर दि ,२४ मार्च : आदिवासी विकास विभागाच्या विविध शासन निर्णयांच्या अनुषंगाने सन २०२६-२७ या वर्षासाठी अनुसूचित जमातीतील (एस.टी.) प्रवर्गातील महिलांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण पळसुंडे (ता. मोखाडा ) येथे आयोजित करण्यात येणार असून, इच्छुक युवतींसाठी ही मोठी संधी आहे.

या प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष शारीरिक चाचणीद्वारे सुरू होणार आहे. त्याच दिवशी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून, अंतिम निवड यादी २ एप्रिल २०२६ रोजी जाहीर केली जाणार आहे.प्रशिक्षण केंद्रात भोजनाची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून, त्याबाबत निवड झालेल्या महिलांना स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहे.

पात्रता निकष

या प्रशिक्षणासाठी किमान १५० सें.मी. उंची, किमान ४५ किलो वजन, वय १८ ते २६ वर्षे आणि किमान १२ वी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे

निवड प्रक्रियेसाठी येताना शाळा सोडल्याचा दाखला, बारावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमिसाईल प्रमाणपत्र, आधार कार्डची प्रत व नाव नोंदणी प्रमाणपत्र अशी सर्व मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. या निवड प्रक्रियेसाठी येण्या-जाण्याचा किंवा राहण्याचा कोणताही भत्ता देण्यात येणार नाही.

सैन्य व पोलीस दलात करिअर करू इच्छिणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी हे प्रशिक्षण मार्गदर्शक ठरणार असून, ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांना नवी संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम आहे.अधिक माहितीसाठी ७३५०३४६०६६ किंवा ८८३०९९३६८८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button