जाहिरातींच्या जोरावर एसटीला २५० कोटींचा महसूल

मुंबई, ४ मार्च २०२६ : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या एसटीच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर महसूलवाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील पाच वर्षांत केवळ जाहिरातींच्या माध्यमातून सुमारे २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या ३१० व्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. राज्यभर पसरलेल्या २५१ आगारांमधून आणि ६१० हून अधिक बसस्थानकांमधून एसटीची सेवा सुरू आहे. सुमारे १२ हजार बसेस दररोज ५० ते ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करतात. भविष्यात बससंख्या वाढल्यास ही संख्या एक कोटींवर जाण्याची शक्यता आहे.
“एसटीची पोहोच ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत आहे. त्यामुळे जाहिरातींसाठी हे प्रभावी माध्यम ठरू शकते,” असे सरनाईक यांनी नमूद केले. बसस्थानक परिसर, बसेसच्या आतील व बाहेरील भाग तसेच उपलब्ध जागांचा वापर करून जाहिरात महसूल वाढविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
यासाठी स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी २५० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल देणारी निविदा मंजूर करण्यात आली आहे. सध्या जाहिरातींतून दरवर्षी सुमारे २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या करारामुळे या उत्पन्नात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.
तिकीट विक्रीव्यतिरिक्त पर्यायी उत्पन्न स्रोत निर्माण झाल्यास एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, असा विश्वासही परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला.