बोईसर शहरात जिओ फायबर इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांमध्ये संताप

बोईसर :- बोईसर शहरात जिओ फायबर इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिओ फायबरची इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक तसेच ऑनलाईन कामावर अवलंबून असलेले नागरिक त्रस्त झाले आहेत.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, कधी अचानक इंटरनेट बंद पडते, तर कधी अतिशय कमी वेगाने इंटरनेट चालते. ऑनलाईन शिक्षण, वर्क फ्रॉम होम, डिजिटल व्यवहार आणि दैनंदिन कामकाजावर याचा गंभीर परिणाम होत आहे. तक्रार नोंदवण्यासाठी कस्टमर केअरला संपर्क साधला असता केवळ फोन किंवा अॅपद्वारे तक्रार घेण्यात येते; मात्र प्रत्यक्ष बोईसर शहरात जिओ फायबरचे कोणतेही कस्टमर केअर किंवा सर्व्हिस सेंटर उपलब्ध नसल्याने समस्या तात्काळ सुटत नाही.
नेटवर्क बिघाड झाल्यानंतर अनेकदा तक्रारीनंतरही तंत्रज्ञ वेळेवर पोहोचत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. काही ग्राहकांनी तर सेवा खंडित राहूनही पूर्ण बिल आकारले जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जिओसारख्या मोठ्या कंपनीकडून दर्जेदार सेवा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
बोईसरसारख्या औद्योगिक व वेगाने विकसित होत असलेल्या शहरात इंटरनेट ही मूलभूत गरज बनली आहे. त्यामुळे जिओ फायबर प्रशासनाने बोईसर शहरात तातडीने स्वतंत्र कस्टमर केअर/सर्व्हिस सेंटर सुरू करावे, नेटवर्क समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात आणि ग्राहकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



