प्रशासनाचा ‘गॅस सुरळीत’ दावा; प्रत्यक्षात ग्राहकांची एजन्सीसमोर गर्दी, बुकिंगसाठी फोनही लागत नाही!

बोईसर, दि. १३ मार्च : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणताही तुटवडा नाही, असा दावा जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक साठेबाजी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मात्र बोईसर मधील अनेक भागांमध्ये प्रत्यक्ष परिस्थिती प्रशासनाच्या दाव्याला छेद देणारी दिसत आहे. गॅस बुकिंगसाठी दिलेले फोन नंबर लागत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून सातत्याने होत असून त्यामुळे नागरिकांना थेट गॅस एजन्सीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे.
परिणामी अनेक ठिकाणी सकाळपासूनच गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
“पुरवठा सुरळीत” असल्याचा प्रशासनाचा दावा असला, तरी प्रत्यक्षात बुकिंगची समस्या आणि एजन्सीसमोरील गर्दी पाहता नागरिकांना गॅस मिळवण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागत असल्याचे वास्तव समोर येत आहे.
यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, गॅस बुकिंग प्रणाली आणि पुरवठा व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
दरम्यान, तक्रार निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ०२५२५-२९७४७४ आणि ८९८३४५६३४७ (व्हॉट्सअॅप) हे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले असले तरी नागरिकांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्षात समस्यांचे निराकरण होत नसल्याची नाराजीही व्यक्त होत आहे.
