देश-विदेश

आसाममध्ये सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळले; दोन वैमानिक शहीद

आसाम : आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी भारतीय हवाई दलाचे सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमान भीषण अपघातात कोसळले. या दुर्घटनेत विमानातील दोन्ही वैमानिक शहीद झाले असून, घनदाट जंगलामुळे शोध आणि बचाव मोहिमेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ७.४२ वाजता या लढाऊ विमानाचा रडारशी संपर्क अचानक तुटला. त्यानंतर तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली. कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील डोंगराळ आणि घनदाट जंगल असलेल्या परिसरात विमानाचा शोध घेण्यासाठी हवाई दलासह स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

दरम्यान, चोकीहोला परिसरातील स्थानिक नागरिकांनी जंगलात विमान कोसळल्याचा दावा केला. त्यानंतर बचाव पथक त्या ठिकाणी पोहोचले आणि रात्री उशिरा विमानाचे अवशेष सापडले. घनदाट जंगल आणि डोंगराळ भूभागामुळे त्या ठिकाणी पोहोचणे अत्यंत कठीण झाले होते.हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण मोहिमेवर होते. डोंगराळ प्रदेशावरून उड्डाण करत असताना अचानक विमानावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेत स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर हे दोन्ही वैमानिक शहीद झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली. हवाई दलाने सोशल मीडियावर पोस्ट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून शहीद वैमानिकांच्या कुटुंबियांसोबत असल्याचेही म्हटले आहे.

सुखोई-30 एमकेआय हे भारतीय हवाई दलातील अत्यंत महत्वाचे आणि आधुनिक लढाऊ विमान मानले जाते. रशियाच्या सुखोई कंपनीने विकसित केलेले हे विमान भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून परवान्याअंतर्गत तयार केले जाते. या विमानाच्या अपघातामुळे संरक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button