डहाणू तालुक्याचा दबदबा कायम; सलग चौथ्यांदा सन्मान चषकावर नाव कोरले
जिल्हा परिषद अधिकारी–कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या

पालघर :- जिल्हा परिषदेमार्फत अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये डहाणू तालुक्याने विविध क्रीडाप्रकारांत घवघवीत यश संपादन करत सलग चौथ्यांदा सन्मान चषक पटकावला. विशेष म्हणजे, या यशामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि योगदान उल्लेखनीय ठरले.
दि. ३१ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या स्पर्धा तीन दिवस चालल्या असून, संपूर्ण काळात उत्साहपूर्ण व खेळभावनेचे वातावरण अनुभवायला मिळाले. जिल्हा परिषद मुख्यालयासह जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आज मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीकमसलत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल विकास) व्यंकटराव हुंडेकर, विभागप्रमुख तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
खो-खो, कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कॅरम, धावणे, रिले, गोळाफेक, थाळीफेक, संगीत खुर्ची, रांगोळी अशा विविध क्रीडाप्रकारांचा या स्पर्धांमध्ये समावेश होता. या स्पर्धांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.
या स्पर्धांसाठी युनियन बँक ऑफ इंडियाने खेळाडूंच्या किटचे (शर्ट व ट्राउझर्स) प्रायोजकत्व स्वीकारले. तसेच तीन दिवसांच्या स्पर्धांचे थेट प्रक्षेपण (Live Telecast) करण्यात आल्याने स्पर्धांचा उत्साह द्विगुणित झाला.
बक्षीस समारंभात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी सर्व सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, हसत-खेळत आणि शिस्तबद्ध वातावरणात स्पर्धा पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पुढील काळातही अशा उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच स्पर्धांसाठी मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे आभार मानले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही कार्यालयीन कामासोबतच शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक भावना जोपासणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
सर्व विजेत्या खेळाडू व संघांना स्मृतिचिन्ह, पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या हस्ते प्रत्येकी ₹१,००० रोख बक्षीस देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
तसेच क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या नियोजन समितीचे सदस्य, पंच आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
