शहर

तारापूर एमआयडीसीत भीषण अपघात! कॅलेक्स केमिकल कारखान्यात रिऍक्टरला आग; एक कामगार गंभीर

बोईसर :- तारापूर एमआयडीसी मधील कॅलेक्स केमिकल अँड फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीच्या प्लॉट नं. एन-१०२/९१ येथील कारखान्यात सोमवारी (दि. २२ डिसेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास मोठा औद्योगिक अपघात घडला. रिऍक्टरमध्ये प्लास्टिक बॅगमधून कच्चामाल टाकण्याचे काम सुरू असताना अचानक रिऍक्टरमधून आग भडकली.

या दुर्घटनेत रवी शंकर पटेल (वय ३२) हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. तिसरी प्लास्टिक बॅग रिऍक्टरमध्ये टाकत असतानाच अचानक आग लागल्याने त्याचे दोन्ही हात, खांदे, मान, एका बाजूचा कान व तोंड गंभीररीत्या भाजले गेले आहेत.

अपघाताच्या वेळी रवी शंकर पटेल याच्यासोबत विपिन कुमार गौतम (वय १८) व राजनबाबू कॉल (वय २५) हे दोघे कामगार प्लास्टिक बॅगचे धागे काढण्याचे काम करत होते. या दोघांनाही किरकोळ भाजले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

घटनेनंतर तिन्ही जखमी कामगारांना तात्काळ अधिकारी लाईफ लाईन रुग्णालय, बेटेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी विपिन कुमार गौतम व राजनबाबू कॉल हे रोजंदारीवर काम करत होते, तर गंभीर जखमी रवी शंकर पटेल हा रामनाथ या कॉन्ट्रॅक्टरमार्फत ऑपरेटर म्हणून कार्यरत होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी हिम्मतराव शिंदे यांनी कारखान्याला भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली. त्यांनी जखमी कामगारांची भेट घेतली असून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

तारापूर एमआयडीसीतील वारंवार होणाऱ्या औद्योगिक अपघातांमुळे कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, कारखान्यांतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button