जव्हार वगळता पालघरमध्ये राष्ट्रवादीची नामुष्की; डिपॉझिट जप्तीचा फटका

पालघर :- जिल्ह्यात अजित दादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण जिल्ह्यात केवळ जव्हार नगरपालिकेत ३ उमेदवार विजयी झाले असून, जिल्ह्यात उर्वरित सर्व नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यातील अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीचे उमेदवार दोन अंकी मतसंख्याही पार करू शकले नाहीत. या निकालांमुळे पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अस्तित्व टिकवणे कठीण झाले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या पराभवामागे केवळ जनतेचा कौल नव्हे, तर पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांकडून आपल्याच उमेदवारांना पाडण्यासाठी विरोधकांशी आर्थिक सेटलमेंट केल्याचे गंभीर आरोप एकनिष्ठ कार्यकर्त्यांकडून केले जात आहेत. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर, काही उमेदवारांनी निषेध म्हणून मतदानालाही न जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर, पालघर जिल्हाध्यक्ष आनंद भाई ठाकूर यांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्यांच्याकडून नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ते आणि माजी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे.“संपूर्ण पालघर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची सुपारी कोणी घेतली?” असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित होत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेतृत्वाने घ्यावी, आणि पक्षाची संघटनात्मक पुनर्बांधणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पालघर जिल्ह्यातील या निकालांमुळे राष्ट्रवादी काँग्रेससमोर गंभीर संघटनात्मक संकट उभे राहिले असून, आगामी काळात पक्ष काय भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

