जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (अजित दादा गट) नगरपालिकेत दारुण पराभवामुळे जिल्हाध्यक्ष पदा बाबत लवकरच निर्णय घेणार…. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे

पालघर :- जिल्ह्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) ला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने पक्षांतर्गत असंतोष उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत पराभवाला कारणीभूत असणारे जिल्ह्याचे नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे.
यावेळी कार्यकर्त्यांकडून पालघर जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आणि निकालांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. एकेकाळी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेल्याने प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षाकडून जिल्हाध्यक्ष पदा बाबत लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन तटकरे यांनी पदाधिकारी यांना दिले आहे.
पालिकेतील निकालांकडे पाहता जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे अपयश आले असून जव्हार नगरपालिकेत अवघे तीन नगरसेवक निवडून आले. उर्वरित ठिकाणी पक्षाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील काही तालुकाध्यक्ष व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी विरोधकांशी तडजोड करून आपल्या उमेदवारांना पाडण्याचे काम केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या आरोपांमुळे पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे डहाणू नगरपालिकेत जिल्हाध्यक्ष यांचे वास्तव्य असूनही राष्ट्रवादीला एकही जागा न मिळता ‘भोपळा’ मिळाला, यामुळे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यामुळे तडजोड करणाऱ्या व पक्षविरोधी भूमिका घेत आपल्याच उमेदवारांना निवडणुकीत पाडण्याचे काम करणारे आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अस्तित्व धोक्यात टाकणारे पदाधिकाऱ्यांना तात्काळ पाय उतार करण्याची जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून होत असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पालघर जिल्ह्यात संघटनात्मक बदल करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

