काटकर पाडा सेल्फी पॉईंटचे उपसरपंच निलम संखे यांच्या हस्ते उद्घाटन

बोईसर : काटकर पाडा परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या समस्येला आज मोठा दिलासा मिळाला. काटकर पाडा सेल्फी पॉईंटचे उद्घाटन बोईसर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निलम संखे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
उद्घाटनावेळी बोईसर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि काटकर पाड्यातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या आकर्षक सेल्फी पॉईंटमुळे रहिवाशांनी ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक आभार मानले.

या ठिकाणी पूर्वी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरातून तीव्र दुर्गंधी पसरत असे. रोगराईचा धोका वाढण्याबरोबरच शाळेतील विद्यार्थ्यांना या घाणीतून जाताना तोंडाला रुमाल बांधून मार्ग काढावा लागत असे.
आता नव्या सेल्फी पॉईंटच्या उभारणीमुळे परिसर स्वच्छ, सुशोभित आणि प्रदूषणमुक्त होण्यास मोठी मदत होणार आहे.
“काटकर पाडा ही माझी कर्मभूमी असून या ठिकाणी नेहमीच चांगले उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे उपसरपंच निलम संखे यांनी यावेळी सांगितले.


