पाण्यासाठीचा वाद ठरला जीवघेणा; डास मारण्याचा स्प्रे फवारत महिलेने केला शेजाऱ्याचा खून!
विरार : वसई–विरारमध्ये पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना, पाण्यासारख्या किरकोळ कारणावरून एकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना विरार पश्चिमेच्या जेपी नगरमध्ये घडली आहे. पाणी भरण्यावरून झालेल्या वादात महिलेने डास मारण्याचा स्प्रे फवारून शेजाऱ्याचा जीव घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
१५ क्रमांकाच्या इमारतीत राहणारे उमेश पवार (५३) आणि कुंदा तुपेकर (४७) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून पाण्यावरून सतत वाद सुरू होते. मंगळवारी रात्री पुन्हा पाणी भरण्यावरून दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. रागाच्या भरात संतापलेल्या कुंदा तुपेकर यांनी घरातील डास मारण्याचा स्प्रे आणला आणि थेट उमेश पवार यांच्या तोंडावर फवारला.
स्प्रेचा तीव्र परिणाम जाणवताच उमेश पवार तेथेच कोसळले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांच्या तक्रारीवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत आरोपी कुंदा तुपेकर हिला अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण जेपी नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पाणीटंचाईमुळे नागरिकांच्या मनातील तणाव किती टोकाला पोहोचत आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.



