पालघर

दिव्यांग क्षेत्रात विना नोंदणी कार्य करणाऱ्या संस्थांवर कारवाई – जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर

पालघर :- जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था कोणतीही नोंदणी न करता कार्यरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून, अशा संस्थांनी कायदेशीर नोंदणी करणे बंधनकारक असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी दिली. दिनांक 30 नोव्हेंबर 2025 ही नोंदणीसाठी अंतिम मुदत असून, त्यानंतर विना नोंदणी कार्य करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली 7 नोव्हेंबर 2025 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी संस्थांची नोंदणी अनिवार्य असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार दिव्यांग कल्याण आयुक्त यांना सक्षम अधिकारी घोषित करण्यात आले असून, त्यांच्याकडूनच नोंदणी प्रमाणपत्रे देण्यात येतात.

अधिनियमातील कलम 51 आणि 52 नुसार दिव्यांग क्षेत्रात कोणतेही कार्य करण्यापूर्वी संस्थेची नोंदणी आवश्यक आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यातील सर्व संस्थांनी 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी नोंदणीचा प्रस्ताव जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा, कलम 91 नुसार विना नोंदणी कार्य करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही डॉ. हसनाळकर यांनी सांगितले.

डॉ. प्रकाश हसनाळकर यांनी संस्थांना आवाहन केले की, दिव्यांग बांधवांच्या हक्कांचे संरक्षण आणि पारदर्शक कामकाजासाठी नियमानुसार नोंदणी करून शासनाच्या प्रक्रियेस सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button