विशेष

मानधन समितीतील लाभार्थ्यांचा सन्मान; पद्मश्री पुरस्कारप्राप्त तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा विशेष गौरव

पालघर : जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेच्या समिती बैठकीनिमित्त मानधन योजनेतील एकूण ६५ लाभार्थी कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्षपद पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड भूषवत असून, बैठकीदरम्यान समितीतील पालकमंत्री नियुक्त सदस्य आणि नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले सुप्रसिद्ध तारपा वादक भिकल्या धिंडा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल भिकल्या धिंडा यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे केवळ पालघर जिल्ह्याचाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील लोककला क्षेत्राचा सन्मान वाढल्याची भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सदस्य सचिव अशोक पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीफ मसलत, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. प्रकाश हसनाळकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

या बैठकीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील कलाकारांची दस्तऐवज पडताळणी देखील करण्यात आली. मानधन योजनेचा लाभ पारदर्शकपणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी पद्मश्री पुरस्कारप्राप्त भिकल्या धिंडा यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत सांगितले की,“या समितीतीलच एक कलाकार पद्मश्री पुरस्कार प्राप्त करतो, ही बाब सर्व कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्यातूनही कोणीही अशा सर्वोच्च सन्मानापर्यंत पोहोचू शकतो.”

तसेच शासनामार्फत सुरू असलेले दरमहा पाच हजार रुपये मानधन वृद्ध साहित्यिक व कलाकारांसाठी अत्यंत उपयुक्त असून, त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मोठा आधार ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरवर्षी या समितीअंतर्गत १०० इष्टांक निश्चित करण्यात आले असून, ठरावीक निकषांच्या आधारेच पात्र कलाकारांची निवड केली जाते, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

मानधन समितीची बैठक, लाभार्थ्यांची दस्तऐवज पडताळणी आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त कलाकाराचा गौरव अशा त्रिसूत्री कार्यक्रमामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button