विशेष

हिंदवी स्वराज्याचा जयघोष! माकणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती जल्लोषात साजरी

एच.लोखंडे सफाळे

पालघर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त माकणे (सफाळे पश्चिम) येथे शिवसंग्राम प्रतिष्ठानच्या वतीने अभूतपूर्व उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. भगव्या ध्वजांच्या लहरी, “जय शिवाजी, जय जिजाऊ” च्या गर्जना आणि शिवभक्तांच्या उस्फूर्त सहभागाने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

भगव्या ध्वजांची दिमाखदार मोटरसायकल रॅली

शिवप्रेमी मावळ्यांनी परिसरात भव्य मोटरसायकल रॅली काढत भगव्या झेंड्यांनी वातावरण भारावून टाकले. घोषणांनी दुमदुमलेल्या या रॅलीने माकणे–सफाळे–माकणे असा मार्ग पार करत शिवभक्तीचा संदेश घराघरांत पोहोचवला. महिला, तरुणी, पुरुष, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी मराठमोळ्या पारंपरिक वेशात सहभाग घेत शिवरायांप्रती आपली निष्ठा व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती, विचारांचा जागर

शिवजयंती निमित्त उभारलेल्या भव्य शामियान्यात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. गुरुवर्य राजन घरत सर (माजी मुख्याध्यापक, म. पंडित विद्यालय, सफाळे), डॉ. मनोज विश्वकर्मा (PHC सफाळे), जेष्ठ शिवसैनिक श्री. रामचंद्र घरत (कांद्रेभुरे) व श्री. रघुनाथ पाटील (सरावली), सामाजिक कार्यकर्ते व उपसरपंच श्री. राजेश म्हात्रे (बंटी), सरपंच श्री. प्रमोद शेलार (माकणे), उपसरपंच सौ. तनुजा घरत, अनुप पाटील कपासे, श्री. समीर म्हात्रे, प्रभारी पोलिस अधिकारी सचिन पाटील, ॲड. नविन पाटील, श्री. विंकोश म्हात्रे (जलसार), पत्रकार श्री. जतिन कदम व श्री. हिरालाल लोखंडे यांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून शिवछत्रपतींना अभिवादन केले.

पोवाडे, गीतांमधून शिवचरित्राचा जागर

कु. त्रिशा अनिकेत पाटील हिने सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकली. कु. जयस्वाल हिने शिवरायांचा इतिहास प्रभावीपणे उलगडून सांगत तरुण पिढीसमोर आदर्श ठेवला. गुरुवर्य राजन घरत सरांनी शिवरायांचे विचार आजच्या पिढीसाठी किती मार्गदर्शक आहेत यावर भाष्य केले. श्रीम. सरस्वती तरे यांनी आपल्या लेकींसह सादर केलेल्या गीताने कार्यक्रमात भक्तिभावाचा रंग भरला.

शिवमूर्तीची भव्य शोभायात्रा

कार्यक्रमानंतर शिवमूर्तीची भव्य रॅली काढण्यात आली. शिवगर्जना, ढोल-ताशांचा गजर आणि भगव्या पताकांच्या साक्षीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. शिवजयंतीचा हा सोहळा केवळ उत्सव नव्हता, तर शिवविचारांचा जागर आणि समाजएकतेचा संदेश देणारा ऐतिहासिक क्षण ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शिवसंग्राम प्रतिष्ठान माकणे यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.– सौजन्य: अॅड. नविन रामचंद्र घरत, सचिव, शिवसंग्राम प्रतिष्ठान माकणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button