सिकलसेल निर्मूलन मोहिमेला वेग!
आरोग्यमंत्री यांचे OSD डॉ. आडकेकर यांची आयुष्मान आरोग्य मंदिर, गोंदे बु. येथे पाहणी

पालघर :- जिल्ह्यात सिकलसेल ॲनिमिया आजाराच्या निर्मूलनासाठी राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री मा. प्रकाश अबीटकर यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) मा. डॉ. आडकेकर यांनी मो–हांडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र, गोंदे बु. येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चत्तर यांच्यासह संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. आडकेकर यांनी अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानासह जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच ० ते ४० वर्ष वयोगटातील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल ॲनिमियाची तपासणी पूर्णत्वास नेण्याच्या स्पष्ट सूचना देत अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
पालघर जिल्ह्यात आतापर्यंत या विशेष अभियानांतर्गत २ लाख ३३ हजार ३९० नागरिकांची सिकलसेल तपासणी पूर्ण करण्यात आली असून, त्यापैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे नमुने BPHU व HLL संस्थांच्या माध्यमातून तपासून अचूक निदान करण्यात येत आहे. तसेच संबंधित रुग्णांना सिकलसेल कार्ड, आवश्यक औषधोपचार व नियमित उपचार सेवा पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
आरोग्य विभागाच्या या अभियानामुळे जिल्ह्यात सिकलसेल आजाराच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी ठोस पावले उचलली जात असून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

