गुन्हे वार्ता

हॉर्नच्या किरकोळ वादातून रक्तरंजित हाणामारी, केळवे–दांडाखाडीतील मँग्रोज रिसॉर्ट बाहेर लोखंडी रॉडने हल्ला, रिसॉर्ट मालकासह चौघे जखमी

पालघर :- जिल्ह्यातील केळवा सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केळवे-दांडाखाडी येथील मँग्रोज रिसॉर्टबाहेर सोमवारी सायंकाळी गंभीर घटना घडली. लग्न समारंभानंतर पाहुण्यांच्या वाहनांच्या ये-जा दरम्यान हॉर्नच्या किरकोळ कारणावरून वाद चिघळून लोखंडी शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याने रिसॉर्ट मालकासह चार जण गंभीर जखमी झाले.

मँग्रोज रिसॉर्टमध्ये आयोजित विवाह सोहळ्यासाठी पाहुण्यांच्या ने-आणीसाठी काही वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती. परतीसाठी एका मारुती इको गाडीत वयोवृद्ध महिला बसत असताना, शेजारच्या क्रिक वूड रिसॉर्टमधून यश मिलिंद म्हात्रे व त्याचा मित्र जय निकम कारने जात होते. रस्त्यात इको गाडी उभी असल्याने त्यांनी जोरजोरात हॉर्न वाजवण्यास सुरुवात केली.

यावेळी लग्न समारंभातील अजय भोईर यांनी महिलांना गाडीत बसू द्यावे, बाजूने जावे किंवा थोडा वेळ थांबावे अशी विनंती केली. मात्र या कारणावरून यश म्हात्रे संतापला. त्याने गाडीतून लोखंडी टॉमी काढून अजय भोईर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अजय भोईर यांनी प्रसंगावधान राखत टॉमी हिसकावून घेतली.

यानंतर शाब्दिक वाद सुरू असतानाच यशचा मित्र जय निकम मागून येत अजय भोईर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार वार केला. या हल्ल्यात अजय भोईर गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले. त्यांना वाचविण्यासाठी आलेले चेतन म्हात्रे व उद्धव भोईर यांनाही लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मँग्रोज रिसॉर्टचे मालक हरेश बारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जय निकम याने अचानक हरेश बारी यांच्या डोक्यावरही लोखंडी रॉडने हल्ला केल्याने तेही जखमी झाले.

या घटनेनंतर लग्न समारंभातील उपस्थितांमध्ये आरोपीं विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच केळवा सागरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या मारहाणीप्रकरणी केळवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी चारही जणांना पुढील उपचारासाठी पालघर येथील धडा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केळवा सागरी पोलिस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button