नगर पालिकेत डिपॉझिट जप्त, संघटना उद्ध्वस्त तरी आनंद ठाकूर अजूनही जिल्हाध्यक्ष!

पालघर :- जिल्ह्यात अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना, या परिस्थितीला जबाबदार कोण? हा प्रश्न आता थेट जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांच्यावर बोट दाखवत आहे.“पक्ष संपत चालला आहे, जिल्हाध्यक्ष मात्र खुर्ची सोडायला तयार नाहीत,” अशी तीव्र भावना पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.
निवडणूक दर निवडणूक पराभव, तरीही पदावर ठाण मांडून बसलेले
लोकसभा असो, विधानसभा असो वा नगरपालिका—प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पालघर जिल्ह्यात अपयशच पदरी पडलं. काही ठिकाणी तर डिपॉझिट जप्त होण्यापर्यंत वेळ आली.तरीही या अपयशांची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याऐवजी, आनंद ठाकूर यांनी जिल्हाध्यक्ष पदाची खुर्ची घट्ट पकडून ठेवली असल्याचा आरोप कार्यकर्ते करत आहेत.
पक्षासाठी शून्य, स्वतःसाठी सर्व काही?
कार्यकर्त्यांचा आरोप आहे की आनंद ठाकूर यांनी पक्षसंघटना वाढवण्याऐवजी, स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांवरच अधिक भर दिला. तडजोडींच्या राजकारणातून आपलेच हित साधत मोठी माया जमविली आहे, पण यांच्या मुळे पक्ष मात्र अक्षरशः उद्ध्वस्त झाला, अशी चर्चा आता उघडपणे सुरू आहे.
खुर्चीखाली दडलेलं ‘सत्य’ कधी बाहेर येणार?
जिल्ह्यातील वास्तव चित्र वेगळं असताना, वरिष्ठ नेत्यांपर्यंत मात्र “सगळं नियंत्रणात आहे” अशा खोट्या पॉझिटिव्ह रिपोर्ट्स पोहोचवल्या जात असल्याचा गंभीर आरोप आहे. नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने आनंद ठाकूर वरिष्ठांची दिशाभूल करत आहेत? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.
कार्यकर्त्यांचा विश्वास गमावलेलं नेतृत्व
आज परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातील अनेक निष्ठावान कार्यकर्ते निष्क्रिय झाले आहेत, काहींनी तर पक्षाकडे पाठ फिरवली आहे.“जिल्हाध्यक्षच जर पक्षासाठी लढत नसतील, तर आम्ही का रस्त्यावर उतरायचं?” असा सवाल कार्यकर्ते करत आहेत.
आनंद ठाकूर ‘इतिहासजमा’ होणार का?
राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा रंगली आहे—अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते आनंद ठाकूर यांना बाजूला करून पालघर जिल्ह्यात नव्या दमाचं नेतृत्व देणार का? कारण कार्यकर्त्यांचा ठाम दावा आहे की, आनंद ठाकूर जिल्हाध्यक्ष राहिले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पालघरमध्ये संपुष्टात येईल, आणि ते पद सोडले, तरच पक्षाला नवसंजीवनी मिळू शकते.



