पालघर वाहन चालक संघटनेतर्फे वाडाखडकोना येथे वनराई बंधाऱ्यांची उभारणी

पालघर :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जलसंधारणाच्या माध्यमातून शेतीला बळकटी देणे आणि भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हा परिषदेमार्फत वनराई बंधारे उभारणीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील विविध संघटनांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या उपक्रमाअंतर्गत “बहुजन हिताय बहुजन सुखाय” हे घोषवाक्य कृतीत उतरवत पालघर वाहन चालक संघटनेच्या वतीने पालघर तालुक्यातील वाडाखडकोना ग्रामपंचायत हद्दीत दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी वनराई बंधाऱ्यांची उभारणी करून काम पूर्ण करण्यात आले.
डोंगराळ भागातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ते स्थानिक पातळीवर साठवणे, भूक्षरण रोखणे तसेच शेतीला पाणी उपलब्ध करून देणे या उद्देशाने कच्च्या स्वरूपातील वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या लोकसहभागातून भविष्यात पूरस्थिती व पाणीटंचाईसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होणार आहे.
या प्रसंगी ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये सरपंच अरुण कामठी, उपसरपंच मनिषा गोरखना, ग्रामसेवक विराज भोये, सदस्य मंगेश वरठा तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा समावेश होता. तसेच पालघर जिल्ह्यातील वाहन चालक व निमशासकीय वाहन चालक यांच्या संयुक्त सहभागातून हे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अशोक पाटील तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) व्यंकटराव हुंडेकर यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे वाहनचालक संघटनेने सांगितले.
सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण व जलसंधारणाच्या कार्यात वाहन चालक संघटनेने मोलाची भूमिका बजावली आहे.



