५३ व्या विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळा सहाय्यक गटात शिंदे सरांची बाजी

बोईसर : – नूतन विद्यामंदिर, उमरोळी येथे तालुका पालघर येथे आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन (सन २०२५–२६) उत्साहात पार पडले.
या विज्ञान प्रदर्शनात प्रयोगशाळा सहाय्यक गटातून सेवा आश्रम विद्यालय बोईसर येथील हरहुन्नरी, विद्यार्थीप्रिय प्रयोगशाळा सहाय्यक श्री. रामदास शिंदे सर यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
विशेष बाब म्हणजे, मागील सलग १० वर्षांपासून शिंदे सर प्रथम क्रमांक मिळवत आहेत, ही सेवा आश्रम विद्यालय बोईसर साठी अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे आणि प्रयोगशील दृष्टिकोनामुळे पंचक्रोशीत शाळेचा लौकिक वाढविण्यात मोलाचा वाटा त्यांनी उचलला आहे.
या यशामागे सेवा आश्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहकारी प्रयोगशाळा सहाय्यक तसेच विज्ञान शिक्षकांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली. शिंदे सर यांच्या यशासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद व विद्यार्थ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री. रामदास शिंदे सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.



