शैक्षणिक

कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज

पालघर | दि. 29 जानेवारी 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कॉपीमुक्त, पारदर्शक, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात परीक्षा पार पडाव्यात, या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे जिल्हास्तरीय दक्षता समितीची सविस्तर बैठक आज पार पडली. ही बैठक जिल्हाधिकारी तथा दक्षता समितीच्या अध्यक्षा मा. डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या महत्त्वपूर्ण बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षण विभाग (योजना), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांचे प्राचार्य, महसूल विभागाचे प्रतिनिधी तसेच जिल्हास्तरीय दक्षता समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीदरम्यान जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर कॉपी, गैरप्रकार, दबाव, अफवा व अनुचित प्रकार रोखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात आले असून, विशेषतः संवेदनशील व अतिसंवेदनशील परीक्षा केंद्रांवर महसूल विभागामार्फत विशेष भरारी पथके नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

ही भरारी पथके परीक्षा काळात अचानक तपासण्या करून प्रश्नपत्रिका वितरण, परीक्षा केंद्रावरील शिस्त, पर्यवेक्षकांची उपस्थिती, बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप, मोबाईल अथवा इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट व ठोस निर्देश देताना सांगितले की,“कॉपीमुक्त परीक्षा हे केवळ शिक्षण विभागाचे नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाचे सामूहिक उत्तरदायित्व आहे. सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून जबाबदारीने काम करावे. परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षण, सुरक्षा व्यवस्था, प्रश्नपत्रिका हाताळणी, तसेच अहवाल सादरीकरणाबाबत ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोर पालन करण्यात यावे.”

तसेच त्यांनी पुढे नमूद केले की,“कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने देखरेख ठेवण्यात येणार असून, परिस्थितीनुसार आवश्यक ते अतिरिक्त उपाय तात्काळ राबविण्यात येतील. कोणत्याही दबावाला बळी न पडता नियमांचे कठोर पालन करावे.”

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनीही कॉपीमुक्त अभियानाबाबत प्रशासनाची ठाम भूमिका मांडली. ते म्हणाले की,“परीक्षा काळात शिक्षण विभागाशी संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या नियोजित पद्धतीने व प्रभावीपणे पार पाडाव्यात. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येईल.”

तसेच कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी प्रशासन, महसूल व शिक्षण विभाग यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी व गतिमान करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक परीक्षा केंद्राची माहिती, निरीक्षण अहवाल व तक्रारींचे तात्काळ निराकरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीच्या शेवटी कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले असून, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना न्याय्य व पारदर्शक परीक्षा प्रक्रिया उपलब्ध करून देण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button