पारदर्शक, शिस्तबद्ध व भयमुक्त परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

पालघर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी राज्यभर ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यावर भर देण्यात येत आहे.
यासंदर्भात मुंबई विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांनी संयुक्त आवाहन करत शाळा प्रशासन, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवावा, असे स्पष्ट केले आहे.
इयत्ता १२ वीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६, तर १० वीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे. या काळात परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, विशेष दक्षता पथके, केंद्रस्तरीय यंत्रणा अधिक सक्रीय करण्यात येणार असून संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवली जाणार आहे.
कॉपीमुक्त अभियानांतर्गत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काय करावे व काय करू नये, याची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पालक–विद्यार्थी सभा घेऊन शिक्षांची यादी समजावून सांगणे, अफवांपासून दूर राहण्याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
“भयमुक्त वातावरणात विद्यार्थी आपली गुणवत्ता सिद्ध करतील. कॉपीमुक्त व पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले.शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनीही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने, चिठ्ठ्या किंवा कोणतेही अनधिकृत साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, परीक्षा केंद्रांवर स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, योग्य प्रकाश, बैठक व्यवस्था व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत तणावमुक्तपणे परीक्षेला सामोरे जावे, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
परीक्षांबाबत कोणतीही माहिती हवी असल्यास अफवांवर विश्वास न ठेवता संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



