डहाणू पंचायत समितीच्या वार्षिक कामकाज तपासणीदरम्यान अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

पालघर :- पंचायत समिती डहाणूच्या सन 2021-22 या वर्षातील वार्षिक कामकाज तपासणीचा टिपणी अहवाल वाचन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) इजाज अहमद शरीक मसलत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या तपासणीस गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, सहाय्यक गट विकास अधिकारी रेखा बनसोडे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी विलास वळवी तसेच पंचायत समितीचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
तपासणीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बांधकाम विभाग, ग्रापापु, लघुपाटबंधारे आणि पीएमएवाय या विभागांत प्रलंबित व अपूर्ण कामांच्या प्रगतीविषयी तपशीलवार चर्चा झाली. अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, विशेषतः पीएमएवाय अंतर्गत घरकुले निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
पशुसंवर्धन, कृषी, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागातील लाभार्थ्यांना योजना देताना दुबार नोंदी टाळून काटेकोर पडताळणी करावी, असे मार्गदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत यांनी दिले.
दररोजच्या प्रशासनिक कामकाजाला गती देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व एआयचा उपयोग कसा करता येईल, याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
बैठकीत विविध विभागांचे प्रलंबित मुद्दे, कामांची सद्यस्थिती, आगामी प्राधान्यक्रम आणि सुधारणा उपाय योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना वेळेच्या मर्यादेत गुणवत्तापूर्ण कामकाज सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.



