चिंचणीत शिवजयंतीचा जल्लोष
३९६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन; पोवाड्याने भारावले वातावरण

एच. लोखंडे ( प्रतिनिधी )
पालघर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त चिंचणी (ता. डहाणू, जि. पालघर) येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवभक्तांनी उत्साह, जल्लोष आणि अभिमानाने शिवजयंती साजरी केली. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी दिमाखात सजला होता.
यावेळी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली. “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी चौक दणाणून गेला आणि वातावरण शिवमय झाले.
कार्यक्रमात श्री. जगदीश विंदे सर यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्याने उपस्थितांना इतिहासाच्या रणांगणात नेले. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणामुळे उपस्थित शिवप्रेमी भारावून गेले.
या प्रसंगी चिंचणी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच चिंचणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. शिवकुमार नंदगावे, श्री. भुषण संखे सर, सुतार सर, वसंत जाधव साहेब, राकेश फूले, देवानंद शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. निवृत्ती जोशी, शुभम चूरी, दर्शन शिंदे, यश धांगडा, शेर बहादूर यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री. नंदगावे सर व आशा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपतींच्या शौर्य, धैर्य आणि स्वराज्याच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा चिंचणी नगरीत झाला.



