पालघर

सुप्रसिद्ध हास्य कलाकार “भाऊ कदम” उद्या पालघर मध्ये !

पालघर :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला अधिक बळकटी देण्यासाठी सुप्रसिद्ध हास्यकलाकार, नाट्य व चित्रपट अभिनेते भाऊ कदम पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या विशेष उपस्थितीमुळे ग्रामविकास चळवळीला नवे चैतन्य मिळणार आहे. १३ जानेवारी रोजी होणाऱ्या या दौऱ्यात भाऊ कदम थेट ग्रामस्थांशी संवाद साधत, आपल्या खास विनोदी शैलीतून अभियानाची उद्दिष्टे, ग्रामपंचायतींची भूमिका आणि लोकसहभागाचे महत्त्व प्रभावीपणे मांडणार आहेत.

या जनजागृतीपर दौऱ्याअंतर्गत पालघर तालुक्यातील चहाडे व उमरोळी, डहाणू तालुक्यातील घोलवड, तसेच वाडा तालुक्यातील हमरापूर या ग्रामपंचायतींना भेटी देण्यात येणार आहेत. अनुभवाधारित सादरीकरण, थेट संवाद आणि विनोदाच्या माध्यमातून भाऊ कदम ग्रामस्थांना विकास प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी प्रेरित करणार आहेत.

या उपक्रमामुळे ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण विकासकामांना गती मिळेल, तसेच समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत जनजागृती वाढून लोकसहभाग अधिक सशक्त होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

हा उपक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या समन्वयातून राबविण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी-कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका, बचत गटांच्या महिला तसेच सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जनजागृतीपर उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे.

संवादात्मक सादरीकरण, लोकसहभाग आणि विकासाची ठाम दिशा — मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख होतील, असा ठाम विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button