महाराष्ट्र

शिरगावात ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चा जल्लोष

“पालघर जिल्हा जगाशी जोडला जाणार” – पालकमंत्रींचा विश्वास

पालघर :- शिरगावच्या नयनरम्य किनारपट्टीवर आयोजित ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ आणि पालघर मिनी सरस प्रदर्शन यांचे उद्घाटन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. २२ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून कोकणच्या संस्कृती, पर्यटन आणि स्थानिक उद्योजकतेचा संगम येथे अनुभवायला मिळत आहे.

उद्घाटन प्रसंगी आमदार राजेंद्र गावित, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, राष्ट्रीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर, अभिनेते अरुण नलावडे, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

किनारपट्टी विकासासाठी व्यापक आराखडा

पालकमंत्री गणेश नाईक यांनी शिरगाव, केळवा, सातपाटी, माहीम, चिंचणी, बोर्डी, नांदगाव, वाढराई, एडवन, उसरणी, अर्नाळा व वसई या किनारपट्टी भागांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करण्याची घोषणा केली.

“पर्यटकांसाठी सुरक्षा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत निसर्गसौंदर्य खुलविण्यावर भर दिला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. डीपीडीसी बैठकीत सविस्तर विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदरामुळे पालघरचा कायापालट

वाढवण येथे उभारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, बडोदा–मुंबई मार्ग आणि विरार–अलिबाग मार्ग या प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्यात पायाभूत सुविधांचे जाळे उभे राहील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

“उद्योग येतील; मात्र स्थानिक शेतकरी व युवकांचा विकास केंद्रस्थानी राहील,” असे ते म्हणाले.

‘हरित पालघर’ची महत्त्वाकांक्षी संकल्पना

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचे ध्येय ठेवण्यात आले असून पालघर जिल्ह्यात १२ कोटी झाडे लावण्याचे नियोजन असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. वणव्यांवर नियंत्रणासाठी चॉपर व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच एआय आणि ड्रोनच्या सहाय्याने वन्यजीव हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिकांना विकासाचा थेट लाभ

महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘कोकण सरस’ला चालना देत स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. भविष्यात प्रवासी जलवाहतूक गुजरातपर्यंत नेण्याचा मानसही त्यांनी जाहीर केला.

“निधी कमी पडला तरी उभारला जाईल; विकास थांबणार नाही,” असा ठाम विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

कोकणच्या सांस्कृतिक वैभवाला आधुनिक विकासाची जोड

ग्लोबल कोकण महोत्सव हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून पालघर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा दिशादर्शक ठरणार आहे. पर्यटन, उद्योग, पर्यावरण आणि स्थानिक उद्योजकता यांचा समन्वय साधत पालघर आता जागतिक स्तरावर झेप घेण्यास सज्ज होत असल्याचे चित्र या महोत्सवातून स्पष्ट झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button