सामाजिक

तरुणांसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

पालघर : राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि त्यांच्या रोजगारक्षमतेत भरीव वाढ व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आर्थिक वर्ष २०२४–२५ पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या योजनेच्या माध्यमातून शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील विविध आस्थापनांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून, बेरोजगार युवकांना रोजगाराच्या दिशेने ठोस संधी मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना आकर्षक विद्यावेतन देण्यात येणार आहे.

🔹 १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा ६,००० रुपये,

🔹 आयटीआय व पदविका धारकांना ८,००० रुपये,

🔹 पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना १०,००० रुपये असे विद्यावेतन सलग ११ महिन्यांपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पालघर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये कार्य प्रशिक्षणाच्या संधी विभागाच्या अधिकृत वेबपोर्टलवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या योजनेसाठी उमेदवार महाराष्ट्राचा अधिवासी असावा, वय किमान १८ व कमाल ३५ वर्षे असावे, तसेच किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण (आयटीआय, पदविका, पदवी, पदव्युत्तर) असणे आवश्यक आहे. मात्र सध्या शिक्षण सुरू असलेले उमेदवार तसेच NAPS व MAPS अंतर्गत सहभागी उमेदवार या योजनेस पात्र ठरणार नाहीत. आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य आहे.

इच्छुक उमेदवारांनी https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून आपली प्रोफाईल अद्ययावत करावी. त्यानंतर पालघर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, बँका, पतसंस्था व शैक्षणिक संस्थांनी अधिसूचित केलेल्या रिक्त प्रशिक्षण पदांसाठी थेट अर्ज करता येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अधिकाधिक खाजगी तसेच २० पेक्षा जास्त मंजूर पदे असलेल्या शासकीय आस्थापनांनी शासन निर्णयानुसार प्रशिक्षणार्थींसाठीची रिक्त पदे पोर्टलवर नोंदवावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे.योजनेसंदर्भात अडचण असल्यास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग कार्यालय, पालघर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५२५-२९९८१२ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button