सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाला बळकटी
आरोग्य संचालक व उपसंचालकांची पालघर जिल्ह्यात प्रत्यक्ष पाहणी

पालघर :- सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पालघर जिल्ह्यात राज्यस्तरीय पर्यवेक्षण करण्यात आले. याअंतर्गत राज्य आरोग्य विभागाचे मा. डॉ. आंबाडेकर (संचालक, आरोग्य सेवा) व मा. डॉ. नांदापुरकर (उपसंचालक, मुंबई मंडळ – ठाणे) यांनी मोखाडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा अंतर्गत असलेल्या वाकड पाडा उपकेंद्रास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांनी ‘अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान’ अंतर्गत सुरू असलेल्या तपासणी, नोंदणी, उपचार तसेच जनजागृती उपक्रमांचा सखोल आढावा घेतला. सिकलसेल आजाराच्या लवकर निदानासाठी सुरू असलेल्या चाचण्या, रुग्ण नोंदणी प्रक्रिया आणि उपचार व्यवस्थेची माहिती त्यांनी जाणून घेतली.
यावेळी उपस्थित अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही मोहीम अधिक प्रभावी, नियोजनबद्ध व यशस्वीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः आदिवासी व दुर्गम भागांमध्ये सिकलसेल ॲनिमियाबाबत जनजागृती वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भाऊसाहेब चत्तर, मोखाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पुष्पा गोवारी, वैद्यकीय अधिकारी तसेच संबंधित आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियानास अधिक गती मिळणार असून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना या मोहिमेचा मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.