विद्यार्थिनीला उठाबशा काढायला लावणाऱ्या शिक्षिकेवर अखेर गुन्हा दाखल; पोस्टमार्टम रिपोर्टने उघड केली धक्कादायक बाब

पालघर :- वसईतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शाळेत उशिरा आल्याच्या कारणावरून सहावीत शिकणाऱ्या काजल गौड या विद्यार्थिनीला तब्बल १०० उठाबशांची शिक्षा देण्यात आली होती. ही शिक्षा तिच्या जीवावर बेतल्याने आता शिक्षिका ममता यादव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडलं?
८ नोव्हेंबर रोजी वसई पूर्वेतील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत अनेक विद्यार्थी उशिरा आले होते. शिक्षेच्या स्वरूपात शिक्षकाने सर्वांना १०० उठाबशा काढण्यास सांगितले. काही विद्यार्थ्यांनी दप्तर खांद्यावर घेतलेलेच उठाबशा काढल्या. त्यात या सहावीतील मुलीचाही समावेश होता.
घरी परतल्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली. वसईतील दोन रुग्णालयांतून उपचार मिळूनही प्रकृती ढासळत गेली आणि अखेरीस मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेचे गंभीर पडसाद उमटताच वालीव पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. मात्र मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली.
पोस्टमार्टम रिपोर्टचा धक्कादायक खुलासा
शाळा प्रशासनाचा दावा होता की मुलगी आधीपासूनच आजारी होती. पण पोस्टमार्टम रिपोर्टने या दाव्याला छेद दिला आहे. पोलिसांना मिळालेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात मयत मुलीच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जमा झाले असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
शिक्षण विभागाचा हस्तक्षेप — उच्चस्तरीय समिती गठीत
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा शिक्षण विभागाने तात्काळ कारवाई केली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर यांनी सांगितले की या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.या समितीत उपशिक्षण अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, महिला विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचा समावेश असणार आहे



