बोईसर

तारापूर अणुऊर्जा शाळेत व्यसनमुक्तीची जोरदार हाक; हजारो विद्यार्थी एकत्रित शपथबद्ध

तारापूर :- ज्ञान संवर्धन कार्यक्रमांतर्गत अणुऊर्जा मध्यवर्ती शाळांसाठी आयोजित “ड्रग्सला नाही म्हणा – जीवनासाठी शपथ” हा विशेष जागृती कार्यक्रम हरिदया फाउंडेशन (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अणुऊर्जा मध्यवर्ती शाळा-१, तारापूर यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम देशभरातील ३० अणुऊर्जा मध्यवर्ती शाळांना थेट प्रक्षेपित करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आयआरएस अधिकारी श्री. समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व प्रभावी उदाहरणे आणि प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे समजावले. व्यसनाचे दुष्परिणाम, त्यातून होणारा सामाजिक ऱ्हास आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असलेले धोके यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे आणि हरिदया फाउंडेशन (रजि.) चे अध्यक्ष डॉ. राजेश हरिनाथ यादव यांनी निरोगी जीवनशैली, मूल्यशिक्षण आणि मानसिक सबलतेवर भर देत विद्यार्थ्यांना सकारात्मक वृत्ती अंगीकारण्याचे आवाहन केले.

कार्यक्रम आयोजक आणि अणुऊर्जा मध्यवर्ती शाळा-१, तारापूरचे प्राचार्य श्री. गुणवंत खोबरागडे यांच्या प्रभावी नियोजनामुळे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडलेला कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला.

या उपक्रमात हजारो विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत, “ड्रग्सला नाही म्हणा – जीवनासाठी हो म्हणा” हा सामूहिक संदेश दिला.

ज्ञान संवर्धन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, नैतिकता आणि जीवनकौशल्ये विकसित करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याचे मत सर्व उपस्थितांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button