उशिरा आल्याची शिक्षा ठरली जीवघेणी; सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू

वसई – वसईतील सातीवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय काजल (अंशिका) गौड हिचा शिक्षेमुळे झालेल्या त्रासामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत उशिरा आल्याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना 100 उठाबशांची शिक्षा दिली होती. ही शिक्षा पूर्ण केल्यानंतर काजलची प्रकृती बिघडली आणि अखेर मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी अनेक विद्यार्थी उशिरा शाळेत आले होते. त्यात काजलचाही समावेश होता. शिक्षकांनी सर्वांना उठाबशा काढण्यास सांगितले. काही विद्यार्थ्यांनी तर दप्तर खांद्यावर घेऊनच ही शिक्षा पूर्ण केली. काजलनेही हेच केले.
शाळेतून घरी आल्यानंतर काजलच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला. तिला वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारांसाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शेवटी जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
काजलच्या कुटुंबीयांनी शाळा आणि शिक्षकांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप केले आहेत. “शाळेतील चुकीच्या शिक्षेमुळे आमच्या मुलीचा जीव गेला,” असा कुटुंबीयांचा आरोप आहे. घटनेनंतर पालक आणि स्थानिक नागरिकांनी शाळेबाहेर जमून निषेध नोंदवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेला टाळे ठोकत, शिक्षिकेवर गुन्हा दाखल न झाल्यास शाळा पुन्हा उघडू देणार नसल्याचा इशारा दिला.
दरम्यान, वालीव पोलिसांनी शाळा तसेच रुग्णालयात जाऊन तपास सुरू केला आहे. जे.जे. रुग्णालयाकडून मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाला वेग दिला. लवकरच संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक शिक्षा देणे हा आरटीई 2009 कायद्यानुसार गुन्हा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाईल.”
ही घटना पालघरमधील जानेवारीत घडलेल्या समांतर घटनेची आठवण करून देते. त्या वेळी 13 वर्षीय विद्यार्थिनीला 50 उठाबशांची शिक्षा दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली होती. मुख्याध्यापिकेने माफी मागल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली होती.
काजलच्या मृत्यूमुळे वसई–पालघर परिसरात तीव्र संतापाची लाट असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.



