आदिवासी भागातील आरोग्य सेवेत ढिसाळपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांकडून प्रसूती
डॉक्टरांच्या अनुपस्थितीत परिचारिका आणि कर्मचाऱ्यांकडून प्रसूती; आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार उघड

डहाणू :- तालुक्यातील आदिवासी बहुल भागातील आशागड प्राथमिक आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवारी (१६ नोव्हेंबर) दुपारी एका गरोदर महिलेची प्रसूती केंद्रातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आली. तत्काळ वैद्यकीय सेवेची गरज असताना, केंद्रात एकाही डॉक्टरची उपस्थिती नसणे हा धक्कादायक प्रकार असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
केंद्रात तीन महिला डॉक्टर पूर्णवेळ कार्यरत असल्याचा दावा असला तरी आपत्कालीन प्रसूतीच्या महत्त्वाच्या क्षणी एकही डॉक्टर हजर नव्हता. इतकेच नव्हे, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेत वाकी उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिल्याचे उघड झाले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि नियमांच्या विरोधात हा घेतलेला निर्णय रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणारा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
डहाणू तालुक्यासह पालघर जिल्ह्याचा मोठा ग्रामीण आणि आदिवासी भाग शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांवरच अवलंबून आहे. मात्र डॉक्टरांच्या वारंवार अनुपस्थितीमुळे रुग्णांची हेळसांड होणे, नवजात शिशू आणि महिलांच्या मृत्यूच्या घटना समोर येणे ही चिंताजनक बाब आहे. आशागडमधील घटनेत प्रसूतीदरम्यान कोणतीही गुंतागुंत न झाल्याने अनर्थ टळला. त्याचे श्रेय परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या अनुभवाला जाते.
घटनेची माहिती मिळताच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महिला जनवादी संघटनेच्या अध्यक्ष लहानी दौडा, सदस्य रुपाली बारी, ग्रामपंचायत सदस्य गौरव ठाकूर आदींनी केंद्राला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडून घटनाक्रम समजून घेतल्यानंतर दुपारपासून डॉक्टर अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोग्य विभागाला लेखी तक्रार देऊन तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या अशा हलगर्जीपणाने स्थानिक आदिवासी समाजात संतापाचे वातावरण आहे. शासनाकडून मानधन घेताना जबाबदारी न पार पाडणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी चौकशी सुरू केल्याचे सांगितले.“आशागड आरोग्य केंद्रातील घटनेची चौकशी सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून किंवा इतर डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.



