पालघर जिल्हा परिषदेत जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

पालघर : पालघर जिल्हा परिषदेत आज जननायक बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम साधेपणाने पण अत्यंत आदरपूर्वक पार पडला.
कार्यक्रमाला तंत्रस्नेही शिक्षक तानाजी डावरे, आनंद अनेमवाड, संगणक तज्ञ सतीश साबळे तसेच जिल्हा परिषदेमधील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली अर्पण केली.जननायक बिरसा मुंडा हे आदिवासी समाजातील क्रांतीचे प्रणेते, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील अतुलनीय योद्धे म्हणून ओळखले जातात.

ब्रिटिश सत्तेविरुद्ध ‘उलगुलान’ या महाविद्रोहाचे नेतृत्व करत त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी, जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक स्वाभिमानासाठी अविरत संघर्ष केला. अंधश्रद्धा, शोषण आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत त्यांनी आदिवासी समाजात शिक्षण, जागृती आणि आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.
अशा थोर जननायकाच्या स्मरणार्थ आज जिल्हा परिषदेत आदरांजलीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.



