गुन्हे वार्ता

३७ लाखांची विदेशी दारू जप्त, तस्करीचा पर्दाफाश

पालघर :- जिल्ह्यात अवैध मद्य तस्करीने डोके वर काढलेल्या मद्य माफियांना अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार हिसका दिला आहे. ॲमेझॉनसारख्या नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत डहाणू उत्पादन शुल्क विभागाने तब्बल ३७ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे सीमावर्ती भागात मोठी खळबळ उडाली आहे.

दादरा-नगर हवेली, दीव-दमण येथे कमी करामुळे स्वस्त मिळणारे मद्य पालघर जिल्ह्यात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणले जात होते. शासनाचा महसूल बुडवून, तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत लोटणाऱ्या या तस्करीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहत निर्णायक कारवाई केली आहे.

गोपनीय माहिती, अचूक पाळत, थेट धडक

उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील देशमुख यांना जव्हार परिसरातून तस्करी करणारी गाडी जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला. डहाणू व पालघर येथील भरारी पथकाने जव्हार–नाशिक मार्गावर सापळा रचत आयशर कंपनीची ट्रक (MH 03 / DS 8535) अडवली.

ॲमेझॉनचा शिक्का, आत दारूचा साठा!

या वाहनावर ॲमेझॉनच्या मालवाहतुकीचे पक्के सील लावून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारे सील तोडताच सत्य समोर आले. झडतीदरम्यान दादरा-नगर हवेली राज्यात विक्रीसाठी असलेले २१५ बॉक्स विदेशी मद्य आढळून आले. क्षणातच तस्करांचा डाव फसला आणि संपूर्ण मद्यसाठा व ट्रक जप्त करण्यात आला.

महसूल चोरीवर करारी पाऊल

सीमावर्ती भागात सुरू असलेल्या अवैध मद्य वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे. ही कारवाई म्हणजे मद्य माफियांना थेट इशारा असून, अशा कारवाया पुढेही अधिक तीव्र केल्या जातील, असा स्पष्ट संदेश उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई

ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, पालघर अधीक्षक गणेश बारगजे, उपाधीक्षक अविनाश रणपिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. डहाणूचे निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे, विकास आबनावे, अभिजीत मानकर आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही निर्णायक कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक विश्वजीत आभाळे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button