गुन्हे वार्ता

रात्रीचा चोर अखेर सापडला – ९ गुन्ह्यांचा इतिहास असलेला आरोपी अटकेत

पालघर :- जिल्ह्यात घरफोडी करून नागरिकांच्या सुरक्षिततेला थेट आव्हान देणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या सफाळा पोलिसांनी घट्ट आवळल्या आहेत. सलग घरफोड्या करणाऱ्या कुख्यात आरोपीस अटक करत ३ लाख ९० हजार रुपयांचा चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई गुन्हेगारांसाठी इशाराच ठरली आहे.

दि. १६ जानेवारी २०२६ रोजी रात्रीच्या अंधारात केळवा रोड येथील रहिवाशी निलेश राजू तुंबडे यांच्या घरात खिडकीतून प्रवेश करून चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल ३.७० लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याच गुन्हेगारी साखळीतील दुसरी घटना सफाळा नूतन नगर येथे घडली. “दिशा मोटर्स अँड हार्डवेअर अँड इलेक्ट्रिक” या दुकानाचे छत फोडून चोरट्याने २० हजार रुपये रोख चोरले. घर असो वा दुकान, कुठेही घुसखोरी करणारा हा चोर पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत होता.

पालघर पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख (भा.पो.से.) यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली सफाळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व बारकाईने केलेल्या तपासाच्या जोरावर संशयीत आरोपी सुमन बुल्लू शेख (वय ४४, ठाणे) याला ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपीने दोन्ही घरफोड्यांची कबुली दिली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३.९० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

तपासात उघड झालेली माहिती अधिक धक्कादायक आहे. हा आरोपी केवळ चोर नसून घरफोडी व चोरी प्रकरणातील कुख्यात सराईत गुन्हेगार आहे. बोईसर : ६ गुन्हे, वापी (गुजरात) : २ गुन्हे, विरार : १ गुन्हा

असा गुन्हेगारी इतिहास असलेला आरोपी पुन्हा सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तपास सुरू आहे.

ही धडाकेबाज कामगिरी अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखालीसपोनि दत्ता शेळके, पोउपनि दीपविजय भवर, सहा. फौजदार कल्पेश किणी, पो.हवा. नीरज शुक्ला, हरी चौधरी, लक्ष्मण भोये व पोअं. शिवाजी चिमकर यांच्या पथकाने बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button