कर्तव्य, शौर्य आणि जनसेवेचा अभिमान! पालघर पोलीस दलाकडून ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ उत्साहात साजरा

पालघर :- महाराष्ट्र पोलीस दलाच्या शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि अखंड जनसेवेचा गौरव करणारा ‘महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन’ दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी पोलीस परेड मैदान, कोळगाव येथे अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांच्या नियंत्रणाखाली आकर्षक पोलीस परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे, परि. सहा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार सुशांत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या परेडचे संचलन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समिर मेहेर (जव्हार विभाग) यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर सेकंड कमांडर म्हणून रापोनि/संजय साबळे (पोलीस मुख्यालय, पालघर) यांनी जबाबदारी सांभाळली. या परेडमध्ये पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी शिस्तबद्ध व उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमस्थळी पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख यांनी पालघर पोलीस दल नागरिकांच्या सेवेसाठी सदैव सज्ज असल्याचे ठामपणे नमूद केले. समाजात शांतता, सुरक्षितता व विश्वास निर्माण करणे हे पोलीस दलाचे प्रमुख उद्दिष्ट असून, सायबर गुन्हे, महिला व बालक सुरक्षा, वाहतूक शिस्त आणि विविध जनजागृती अभियानांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांनी पालघर पोलीस दलाने वर्षभरात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला.
हा संपूर्ण कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. यतिश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक श्री. विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोउपनि/समिर भोसले (नेम. सायबर पोलीस ठाणे, पालघर) यांनी प्रभावीपणे केले.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि जनतेशी नाते दृढ करणारा हा सोहळा पालघर पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेचे दर्शन घडवणारा ठरला.



