डहाणूचे माजी नगराध्यक्ष रवींद्र फाटक यांचा शिवसेनेत प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश; डहाणूतील राजकीय समीकरणात बदलाची चिन्हे

डहाणू : डहाणूचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उपजिल्हाध्यक्ष आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक रवींद्र फाटक यांनी शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) पुनर्प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पुन्हा भगवा हाती घेतला.
रवींद्र फाटक हे डहाणूतील एक अभ्यासू आणि लोकसंपर्कात निपुण व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत प्रवेश केल्याने डहाणूच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. फाटक यांना स्थानिक पातळीवर मोठा जनाधार असून, त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे पारडे सध्या तरी जड झाल्याचे चित्र आहे.
गेल्या महिन्यात राजू माच्छी यांनी शिवसेनेत प्रवेश करून डहाणूच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले होते. त्यात आता रवींद्र फाटक यांच्या पुनरागमनामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. डहाणूतील एकाधिकारशाहीला कंटाळलेला वर्ग शिवसेनेकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रवींद्र फाटक यांच्या पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी आदी मान्यवर उपस्थित होते.



