सामाजिक

सिलेंडर साठेबाजी केली तर कठोर कारवाई; प्रशासनाचा स्पष्ट इशारा

अफवांवर विश्वास ठेवू नका; नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन

पालघर :- जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅसच्या तुटवड्याबाबत काही ठिकाणी अफवा पसरत असल्या तरी पालघर जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे, अशी ठाम माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

गॅस तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाईगडबडीत गॅस सिलेंडर साठवण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, घरगुती एलपीजी गॅस केवळ घरगुती वापरासाठीच आहे. त्याचा व्यावसायिक किंवा अन्य अनधिकृत वापर आढळल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या तेल कंपन्यांच्या नियमांप्रमाणे साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी दोन सिलेंडर बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचा कालावधी ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे एक सिलेंडर मिळाल्यानंतर २५ दिवस पूर्ण झाल्यावरच पुढील बुकिंग करता येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांना ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर नियमानुसार शक्य तितक्या लवकर सिलेंडरची डिलिव्हरी करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. बुकिंग किंवा तांत्रिक अडचणी असल्यास नागरिकांनी संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ०२५२५-२९७४७४ आणि ८९८३४५६९४७ (व्हॉट्सअँप) हे दोन संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. या क्रमांकांवर फोन किंवा संदेशाद्वारे नागरिकांना त्यांच्या समस्या नोंदविता येणार आहेत.

तसेच आश्रमशाळा, रुग्णालये आणि मध्यान्ह भोजन यांसारख्या अत्यावश्यक सेवांसाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित सुरू ठेवण्यात येणार आहे. या सेवांमध्ये कोणतीही अडचण निर्माण झाल्यास संबंधित वितरकांवर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात घरगुती गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याने नागरिकांनी शांतता राखून नियमित पद्धतीने गॅसचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button