‘गॅस पुरवठा सुरळीत’ प्रशासनाचा दावा फोल; प्रत्यक्षात ४५ दिवसांनी सिलेंडर, नागरिक संतप्त

पालघर, दि. १४ मार्च : जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असून कोणताही तुटवडा नाही, असा दावा जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा दावा पूर्णपणे फोल ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात अनेक ग्राहकांना गॅस सिलेंडरसाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. एका कुटुंबाचा गॅस सिलेंडर साधारणपणे एका महिन्यात संपत असताना ४५ दिवसांनी सिलेंडर मिळत असेल, तर उर्वरित दिवस नागरिकांनी स्वयंपाक कसा करायचा, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
गॅस बुकिंगसाठी दिलेले फोन नंबर वारंवार लावूनही कॉल लागत नसल्याच्या तक्रारी सर्वत्र होत आहेत. त्यामुळे त्रस्त ग्राहकांना थेट गॅस एजन्सीकडे धाव घ्यावी लागत असून अनेक ठिकाणी सकाळपासूनच ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप अधिक वाढत आहे.
एकीकडे प्रशासन “गॅस पुरवठा सुरळीत” असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नागरिकांना सिलेंडरसाठी दीर्घ प्रतीक्षा, बुकिंगची अडचण आणि एजन्सीसमोरील गर्दी याला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात प्रत्यक्षात गॅस वितरण व्यवस्थेचा गोंधळ उघड होत असून नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. ४५ दिवसांनी सिलेंडर मिळत असताना “पुरवठा सुरळीत” असल्याचा दावा करणे म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होत आहे.
यामुळे प्रशासनाने तातडीने परिस्थितीची गंभीर दखल घेऊन गॅस बुकिंग व वितरण व्यवस्था पारदर्शक आणि सुरळीत करावी, अन्यथा नागरिकांचा संताप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



