पालघर

घरपट्टी सवलत योजनेला मुदतवाढ द्या – निलम संखे यांचे जिल्हा परिषद सीईओंना निवेदन

बोईसर : – पालघर तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान अंतर्गत घरपट्टी थकबाकीवर देण्यात येणारी ५० टक्के सवलत योजना नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरत असून, या योजनेला मुदतवाढ देण्यात यावी, अशी ठाम मागणी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व ग्रामपंचायत बोईसरचे उपसरपंच निलम रमाकांत संखे यांनी केली आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.दि. ३ डिसेंबर २०२५ पासून लागू झालेल्या या योजनेचा लाभ आतापर्यंत मोठ्या संख्येने मिळकतधारकांनी घेतला असून, अनेक ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी थकबाकी वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे.

शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींना ग्रामसभा घेऊन ठराव मंजूर करून या योजनेत सहभागी व्हावे लागत आहे. मात्र ग्रामसभा जाहिर करणे, बहुमताने ठराव घेणे आणि त्यानंतर अंमलबजावणी करणे या प्रक्रियेत काही ग्रामपंचायतींचा मोठा कालावधी खर्ची पडला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२५ ही योजनेची अंतिम तारीख अपुरी ठरत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आजही अनेक ग्रामपंचायतींमध्ये घरपट्टी भरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असून, या सवलत योजनेचा लाभ शेवटच्या मिळकतधारकापर्यंत पोहोचावा, यासाठी योजनेची मुदत वाढवणे अत्यावश्यक असल्याचे निलम संखे यांनी स्पष्ट केले आहे.

“ही योजना ग्रामपंचायतींच्या महसूल वाढीसोबतच सामान्य नागरिकांना दिलासा देणारी आहे. त्यामुळे शासनाने या योजनेला तातडीने मुदतवाढ द्यावी,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

या मागणीमुळे पालघर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायती व करदाते शासनाच्या सकारात्मक निर्णयाकडे आशेने पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button