पालघर

महाराष्ट्र कारखाने नियमांत महत्त्वपूर्ण दुरुस्ती; उद्योग सुलभता, महिला सुरक्षा आणि औद्योगिक आरोग्यावर भर

महिला सुरक्षा, औद्योगिक सुलभता आणि आरोग्यावर भर!

पालघर : महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३ मध्ये व्यापक आणि महत्त्वपूर्ण दुरुस्त्या जाहीर केल्या आहेत. या दुरुस्त्यांचा उद्देश औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया सुलभ होणे, महिला कामगारांच्या सुरक्षिततेला मजबुती मिळणे, कामगारांच्या आरोग्य तपासणीची उपलब्धता वाढणे आणि एकूणच औद्योगिक सुरक्षा मजबूत करणे हा आहे.या बदलांमुळे कारखानदारांवरील प्रशासनिक भार कमी होणार असून कामगारांच्या आरोग्य–सुरक्षेमध्ये मोठी गुणवत्ता सुधारणा अपेक्षित आहे.

वैद्यकीय तपासणी आता अधिक सुलभ

धोकादायक प्रक्रियांतर्गत न येणाऱ्या कारखान्यांना वैद्यकीय तपासणीसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आता तपासणी केवळ प्रमाणक शल्य चिकित्सकांकडूनच नव्हे, तर MBBS वैद्यकीय अधिकारी, ESIC/ESIS रुग्णालयातील डॉक्टर तसेच पाच MBBS डॉक्टर कार्यरत असलेल्या वैद्यकीय संस्थांमधील अधिकारी यांच्याकडूनही केली जाऊ शकते.

यामुळे उद्योगांना वेळ, खर्च आणि प्रक्रिया दोन्ही दृष्टीने मोठा दिलासा मिळणार आहे.

महिला कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

महिला कर्मचारी रात्रपाळीच्या तरतुदींमध्ये लवचिकता दिली असली तरी सुरक्षा उपाय अनिवार्य करण्यात आले आहेत.

कारखान्यांनी—महिला कामगारांची लेखी संमती,सुरक्षित वाहतूक व्यवस्था,कार्यस्थळी सीसीटीव्ही निगराणी,गर्भवती/स्तनपान करणाऱ्या महिलांना धोकादायक कामांपासून वगळणे,रात्रपाळीत किमान दोन महिला कामगारांची उपस्थिती—हे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक केले आहे.

औद्योगिक सुरक्षेसाठी मॉक-ड्रिल अनिवार्य

सर्व कारखान्यांना आता सहा महिन्यांतून एक सुरक्षा मॉक-ड्रिल घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.यामुळे कामगारांना आग, स्फोट, रासायनिक गळती यांसारख्या धोक्यांवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून आपत्कालीन परिस्थितीत प्रतिक्रिया क्षमता अधिक मजबूत होणार आहे.

वसई–पालघर औद्योगिक क्षेत्राला विशेष लाभ

वसई–पालघर जिल्ह्यात महिला कामगारांचे प्रमाण जास्त असल्याने या दुरुस्त्या येथे अधिक सकारात्मक परिणाम घडवतील. इलेक्ट्रॉनिक्स व इतर उद्योगांमधील महिला कामगारांची सुरक्षितता वाढणार रोजगाराच्या संधी अधिक खुल्या होणार, वैद्यकीय तपासणीचे पर्याय वाढल्याने नियमांचे पालन अधिक सोपे होणार. सुरक्षा मॉक-ड्रिलमुळे औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा अपेक्षित आहेत.

या दुरुस्त्यांची अधिकृत माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक श्री. नरेश देवराज (वसई विभाग) आणि सहसंचालक श्री. माधव तोतेवाड (पालघर विभाग) यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button