१४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत अमानुष रॅगिंग, मोखाडा चास येथील आश्रम शाळेत संताप जनक प्रकार

मोखाडा :- आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या चास येथील आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्यासोबत अमानुष रॅगिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
रात्री वसतिगृहात झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने या विद्यार्थ्याच्या डोक्यावरील केस तसेच भुवयांचे केस कापले. इतकंच नव्हे तर केस कापताना डोक्याला जखमही झाली. सकाळी ही घटना लक्षात येताच विद्यार्थी प्रचंड घाबरला, तर पालकांना हे दृश्य पाहून धक्का बसला.
पालकांचा संताप, कारवाईची मागणी
या संतापजनक प्रकारानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.“इतका गंभीर प्रकार घडतोय, मग वसतिगृहातील अधीक्षक, मुख्याध्यापक नेमकं काय करत होते?” असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
गेल्या काही दिवसांत आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटना समोर येत असतानाच, रॅगिंगसारखा अमानुष प्रकार घडल्याने प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि वसतिगृहातील नियंत्रण याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
प्रशासन या प्रकरणात नेमकी काय कारवाई करणार? दोषींना शिक्षा होणार की पुन्हा एकदा हे प्रकरण दुर्लक्षित राहणार? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलली जाणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.



