पालघर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1-ब आणि वाडा नगरपंचायत प्रभाग क्रमांक 12 साठी निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत स्थगित

पालघर, दि. ३० नोव्हेंबर : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी २९ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार न्यायालयीन अपील दाखल असलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२५ जाहीर करण्यात आला आहे. यानुसार काही विशिष्ट प्रभागांमधील निवडणूक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली असून, नव्या कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
पालघर नगरपरिषद : प्रभाग 1-ब ची निवडणूक स्थगित
सुधारित कार्यक्रमानुसार पालघर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 1-ब (सर्वसाधारण) येथील निवडणूक प्रक्रिया सद्यस्थितीत स्थगित करण्यात आली आहे.तथापि, नगराध्यक्ष पदाची निवडणूक तसेच इतर सर्व प्रभागांतील (प्र. क्र. 1-ब वगळून) सदस्य पदांची निवडणूक पूर्वानुसार २ डिसेंबर २०२५ रोजीच होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वाडा नगरपंचायत : प्रभाग 12 ची निवडणूक स्थगित
याच आदेशाच्या अनुषंगाने वाडा नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक 12 (सर्वसाधारण) येथील निवडणूक प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली आहे.याशिवाय, नगराध्यक्ष पदासह इतर सर्व प्रभागांतील (प्र. क्र 12 वगळून) सदस्य पदांच्या निवडणुका निश्चित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर २०२५ रोजीच पार पडणार आहेत.



