गुन्हे वार्ता

नाकोडा ज्वेलर्स दरोड्याचा पर्दाफाश! 5 आरोपी अटकेत, कोट्यवधींचा ऐवज जप्त

पालघर : नाकोडा ज्वेलर्समध्ये घातलेल्या दरोड्याची केवळ 48 तासांत उकल करत पालघर पोलिसांनी पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

तब्बल ₹3 कोटी 72 लाखांचा ऐवज चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली आणि गुजरातमार्गे नेपाळकडे पळ काढणाऱ्या आरोपींचा माग काढत त्यांना सीमा भागातून ताब्यात घेतले.

या कारवाईतून ₹3 कोटी 28 लाख 18 हजार 450 रुपये किंमतीचे सोने, चांदी व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, शहरातील नागरिकांनी पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले आहे.

नाकोडा ज्वेलर्सचे पियुष जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 8 नोव्हेंबर रोजी दुकान बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारील दुकानाचे शटर तुटलेले दिसून आले. तपासात चोरट्यांनी सामाईक भिंतीत मोठा होल पाडून दुकानात प्रवेश केल्याचे उघड झाले. त्यानंतर गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी कापून 5 किलो 420 ग्रॅम सोने, 40 किलो चांदी आणि 20 लाख रुपये लंपास करण्यात आले होते.

तक्रार मिळताच पालघर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मॉलचे वॉचमन दीपक सिंग आणि नरेश हे गुन्ह्यात सहभागी असल्याचे स्पष्ट झाले.

आरोपी गुजरातमार्गे नेपाळकडे पळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पथके रवाना केली आणि नेपाळ सीमेजवळून चार आरोपींना पकडले. तर सुरतमधून आणखी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या या अचूक आणि वेगवान कारवाईमुळे लाखो रुपयांचा ऐवज सुरक्षित परत मिळाला असून, जिल्ह्यात पोलिसांची प्रतिमा अधिक मजबूत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button