पालघर

डहाणू परिसरात जमीन दलालांचा सुळसुळाट; फसवणुकीचा धोका वाढला; परवाना अनिवार्य करण्याची मागणी

डहाणू :- परिसरातील जमीनदर गगनाला भिडत असताना येथे जमीन दलालांची संख्या विस्फोटक पातळीवर वाढली आहे. वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, रेल्वे कॉरिडॉर आणि मुंबई–बडोदा महामार्ग यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर मोठमोठे गुंतवणूकदार येथे गर्दी करू लागले आहेत. या झपाट्याने वाढणाऱ्या जमीन व्यवहारांमुळे दलालांचा अनियंत्रित सुळसुळाट होत असून चुकीची जमीन दाखवणे, बोगस मालक निर्माण करणे, दुसऱ्याची जमीन स्वतःची म्हणून विकण्याचे प्रयत्न अशा फसवणुकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. परिणामी, रिअल इस्टेट दलालांसाठी परवाना अनिवार्य करण्याची मागणी वाढली आहे.

डहाणू परिसरात गेल्या काही काळात जमीन बाजारात अभूतपूर्व तेजी पाहायला मिळत आहे. वाढवण बंदर, बुलेट ट्रेन मार्ग, रेल्वे कॉरिडॉर, मुंबई–बडोदा महामार्ग अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांचा डहाणू व आसपासच्या भागावर होणारा थेट परिणाम म्हणून जमिनींच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. या स्थितीचा फायदा उठवण्यासाठी स्थानिकांसह मुंबई, पुणे, नाशिक आणि गुजरातमधील मोठे गुंतवणूकदार येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्री करत आहेत. यामुळे डहाणूत जमीन दलालांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. गावोगावी, चहाच्या टपऱ्यांवर, नाक्यानाक्यावर, हॉटेलांमध्ये, बस व रेल्वे स्थानक परिसरात जमीन व्यवहारांच्या चर्चांनी माहोलच बदलून गेला आहे. कमी कष्टात मोठे कमिशन मिळेल या अपेक्षेने अनेक बेरोजगार आणि तरुण या क्षेत्रात उतरले असल्याने दलालांचे वाढते जाळे अधिकच अनियंत्रित होत आहे. या वाढत्या दलालीसोबत फसवणुकीच्या घटना गंभीर स्वरूप धारण करत आहेत. चुकीची जमीन दाखवणे, सातबाऱ्यावर दुसऱ्याचे नाव असलेली जमीन स्वतःची म्हणून विकणे, बनावट मालक निर्माण करून व्यवहार करणे, प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या जमिनींचे व्यवहार दाखवणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक गुंतवणूकदारांचे लाखो रुपये बुडाल्याची चर्चा असून, तक्रारदार पुढे येण्यास टाळाटाळ करत असल्याने अनेक प्रकरणांना कायदेशीर रूप मिळत नाही.

या परिस्थितीने त्रस्त झालेल्या स्थानिक नागरिकांसह गंभीर गुंतवणूकदारांकडून आता रिअल इस्टेट दलालांसाठी वैध परवाना प्रणाली लागू करण्याची मागणी प्रबळ होऊ लागली आहे. परवाना मिळाल्यास दलालांची ओळख स्पष्ट होईल, व्यवहार अधिक पारदर्शक होतील आणि फसवणुकीस आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. डहाणू परिसर वेगाने विकसित होत असताना रिअल इस्टेट क्षेत्रात शिस्त व सुरक्षा प्रस्थापित करणे ही प्रशासनाची तातडीची गरज असल्याचे मत स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button