पालघर

दप्तर बनलं ढाल! बिबट्याच्या झडपेतून पाचवीतील विद्यार्थी थोडक्यात बचावला”

विक्रमगड :- तालुक्यात एका थरारक प्रसंगाने नागरिकांना चांगलीच धडकी भरली. शाळेतून घरी परतणाऱ्या पाचवीतील विद्यार्थ्यावर दाट झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. मात्र विद्यार्थ्याच्या पाठीवरील दप्तराने ढाल बनत त्याचा जीव वाचवला.

उटावली येथील आदर्श विद्यालयातील ११ वर्षीय मयंक विष्णू कुवरा हा शुक्रवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मित्रासह घरी परतत असताना बिबट्याचा सामना झाला. अचानक झेप घेतलेल्या बिबट्याने मयंकला पकडण्याचा प्रयत्न केला. बिबट्याचे प्राणघातक वार थेट दप्तरावर बसल्याने मोठा अनर्थ टळला. तरीही नखांमुळे मयंकच्या हातावर खोल जखमा झाल्या.

घाबरून न जाता मयंकने आरडाओरड केली तर त्याच्या मित्राने दगडफेक करत बिबट्याला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या आवाजाने जवळील नागरिकांनी धावत येताच बिबट्या जंगलात पळून गेला. जखमी मयंकवर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, विक्रमगड परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वाढता वावर स्थानिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओंमधून स्पष्ट दिसत आहे. तरीही अनेक विद्यार्थी जंगलातूनच शाळेत ये-जा करत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

या घटनेनंतर नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button