प्राथमिक आरोग्य केंद्र आशागड येथील अनुपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कठोर कारवाई

पालघर : – प्राथमिक आरोग्य केंद्र अशागड (तालुका डहाणू) येथे वैद्यकीय अधिकारी कामावर अनुपस्थित असल्याबाबत विविध वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांवर बातमी प्रसिद्ध झाली होती. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर यांच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन केली होती.
चौकशी समितीच्या अहवालानुसार घटनेच्या वेळी केंद्रातील एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे निष्पन्न झाले असून अहवालाच्या आधारे प्रशासनाने तात्काळ कडक पावले उचलली आहेत.
कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली मालवणकर आणि डॉ. कृतिका जनाठे यांची सेवा समाप्त करण्यात आली असून नियमित वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितिजा पाटील यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आशागडचा कार्यभार अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.



