पालघर

वाडा तालुक्यात टायर कारखान्यांना ‘अभय’? बंदी उठवून पुन्हा धूर; ग्रामस्थांचा संताप उसळला

वाडा : वाडा तालुक्यातील टायर पायरोलेसिस कारखान्यांच्या प्रदूषणाविरोधात नागरिकांच्या तक्रारींवरून काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल ३५ कारखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, बंदीनंतरही अनेक कारखाने पुन्हा सुरू झाल्याचे समोर येताच या कारवाईची विश्वसनीयता आणि पारदर्शकता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

दरम्यान, कारखान्यांबाबतची अधिकृत माहिती मागितली असता एमपीसीबी अधिकाऱ्यांची टाळाटाळ, अपूर्ण प्रतिसाद आणि अकार्यक्षमता पाहून ग्रामस्थ संतापले आहेत. ‘पर्यावरण संरक्षण व संवर्धन प्रतिष्ठान’ या संस्थेने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व कठोर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वाड्यात ७०+ टायर कारखान्यांचा धूर; आरोग्याला गंभीर धोका

उसर, दिनकर पाडा, खरिवली, सापने, कोने, बिलोशी, कुयलू–तोरणे अशा भागांत ७० हून अधिक टायर पायरोलेसिस युनिट्स कार्यरत आहेत. परदेशी टायरपासून कार्बन ब्लॅक, पायरो ऑइल आणि स्टील तयार करण्याच्या प्रक्रियेतून होणारा वायू, धूर, रसायनयुक्त निचरा आणि दुर्गंधी यामुळे,श्वसनाचे आजारत्वचारोगतर काही ठिकाणी कर्करोगाचा संभाव्य धोका असा गंभीर आरोग्यसंकट निर्माण होत असल्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि पर्यावरण तज्ज्ञांनी दिला आहे.

जनता दरबारात, अधिवेशनात मुद्दा पेटला — आदेश जोरात, कारवाई थंड?

हा मुद्दा पालघरच्या जनता दरबारात आणि पावसाळी अधिवेशनात गाजला. पालकमंत्री गणेश नाईक यांनी तातडीची कारवाई करण्याचे आदेश दिले. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनीही दोषी कारखाने आणि निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिल्याने ३५ युनिट्सला बंदची नोटिसा देण्यात आल्या.महावितरणलाही वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले गेले.

तरीही काही दिवसातच कारखाने सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आणि प्रश्न निर्माण झाला—

परवानगी कोणी दिली?

अधिकाऱ्यांना ‘अशीर्वाद’ मिळाला का?

काही माहिती जाणीवपूर्वक दडपली जाते आहे का?

अधिकृत आकडेवारी मागूनही २२ दिवसांपासून एमपीसीबीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हा संशय अधिकच गडद झाला आहे.

टायर रिसायक्लिंग असोसिएशनचे पत्र… आणि नवी चर्चा“

वाडा टायर रिसायक्लिंग असोसिएशन”ने पालकमंत्री गणेश नाईक यांना कारखान्यांवरील ‘अन्यायकारक कारवाई’ थांबविण्याची मागणी करणारे पत्र दिल्याने नवीन वादाला तोंड फुटले. काही नागरिकांनी तर त्यांच्यावर कारखानदारांना छुपा पाठिंबा असल्याचा आरोप केला.

पालकमंत्र्यांच्या कार्यालयाने सर्व आरोप फेटाळत स्पष्ट केले,

➡ “नियमभंग करणाऱ्या व प्रदूषणकारी युनिट्सवर कठोर कारवाईच व्हावी”

➡ “नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने निर्णय घेतला जाईल”

टायर कारखान्यांत अपघातांची धोकादायक मालिका सुरूच

वाडा तालुक्यातील टायर युनिट्स फक्त प्रदूषणच नव्हे तर अपघातांचे केंद्र बनले आहेत.

७ डिसेंबर – लखमापूर येथील सनराईज ग्रीन इंडस्ट्रीजमध्ये भीषण स्फोट; २ कामगारांचा मृत्यू

२०२३ – याच युनिटमध्ये समान प्रकारचा स्फोट

२९ जानेवारी २०२५ – वडवलीतील एम.डी. पायरोलिसेस कंपनीत बॉयलर स्फोट; ४ जणांचा मृत्यू, त्यात दोन चिमुकल्यांचा ही समावेश

या स्फोटांची मालिका थांबण्याचे चिन्ह नाही, परिणामी कामगारांची सुरक्षितता आणि उद्योगांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

“वाडाचा कारभार ठाण्याकडे का?” – नागरिकांचा सवाल

पालघर जिल्हा बनून ११ वर्षे झाली असली तरी वाडा तालुक्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार अद्याप ठाणे-कल्याण कार्यालयाकडेच.

नागरिकांची मागणी —

➡ “कारभार बोईसर एमपीसीबी कार्यालयाकडे वर्ग करा”

➡ “स्थानिकांना न्याय व त्वरित कारवाई मिळेल”

सदस्य सचिवांचे आश्वासन

एमपीसीबी सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले—“सध्या नागपूर अधिवेशनात आहे; मुंबईत परतल्यावर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button